गरिबी जगायला शिकवते.
माझ्या प्रिय मना, एक विचारू का? हो विचार की, तुझं कसं आहे ना. तू खरं काही सांगत नाहीस, आणि एका वेळी एक काम धड करीत नाही. निर्णय कधी नीट घेत नाहीस. याचा मला फार राग येतो. आता तू म्हणशील मला राग येण्याचा काय संबंध आहे. हो तेच म्हणतो ना मी, काय संबंध आहे. आ रे वा. संबंध आहे म्हणून तर, विचारतोय ना? बरं विचार काय म्हणणं आहे. हं बोला.......
सकाळी सकाळी आरशा समोर उभा होतो, माझे प्रतिबिंब मला पाहून म्हणत होतं. तुला एक विचारू का? मी म्हटलं विचार, आणि आरसा अंतरीच मन बोलू लागला. मन गत काळातल्या आठवणीत रंगत गेलो. माझा गत काळ म्हणजे, रखरखीत वाळवंट होत. चुकून सुद्धा पावसाचा शिडकावा येण्याची अजिबात शास्वती नाही.बर का.
माझे आई-बाप पैसेवाले नव्हते, तसे ते भिकारी नव्हते, शेती होती पण, असून उपयोग काय. ती कोरडवाहू होती. पाऊस पडल्या शिवाय ती पिकणार कशी. म्हणून रोज उठून लोकांच्या शेतात घरातल्या मंडळींना मोलमजुरीन काम करावं लागे. आणि येईल त्या मजुरीत घर चालवणं म्हणजे तारेवरची कसरत होती. घरात खाण्याची तोंड वाढत चालली होती. पण पैसे कुठून येण्याचं नाव नाही. आयुष्य असं काही वळण घेत जातं की, आपण त्या वेळेस त्या त्या परिस्थितीचे गुलाम होतो असतो. लहान होतो म्हणून कळत नव्हत. इतकाच काय तो फरक. समजायला लागल अन तिथच घोळ झाला. जस की, कंदिलाची काचेच कस असत जोवर आपण तिला आतून साफ करीत नाही तोवर आपल्याला धूसर दिसत, मग कापड किंवा कागदाच्या बोळ्याने जरा साफ करून बघा नबर, कस लख्ख दिसू लागत. अगदी तस झाल होत. सार कसं स्पष्ट दिसू लागलं.
आता मी, थोडा मोठा झालो. मग काय शाळेत जाण आलं. शाळा तरी कुठं दूर होती म्हणा. आमच्या घरापासून जास्तीत जास्त पन्नास फुटावर असेल. आमच्याच मोठ्या चुलत्याच्या शेताच्या बांधा जवळ. हा आता तू म्हणशील किती छान. घरातून अंगणात आणि अंगणातून शाळेत किती छान, मस्त. हा हे खरं होतं की, शाळा घराच्या बुडाजवळच होती. म्हणूनच मी शाळेत जाऊ शकत होतो. नाही तर घरात दोन शेळ्या होत्या त्यांना चारायला घेऊन गेल्या शिवाय जेवायला कस मिळणार. असा हा आमचा घरगुती अलिखित कानून होता. काही ध्यानात येतय का? नाही ना कस येणार. आपलं सुरळीत असलं की, दुसऱ्याच काय जळत हे बघायला वेळ कोणाला असतो. मुळात शाळेत का जायचं हा खरा वादाचा मुद्दा आहे. मुल शाळेत गेली तर, ही पडेल काम कोण करणार. आई-वडिलानी मुलांच्या खाण्या-पिण्याच बघाव की, फुकट शाळेचा खर्च करीत बसाव. साला फुकटचा ताप झालाय नुसता. बर शाळेत जाऊन काय करायचं. जे शिकलेत त्याच काय चाललय ते दिसत नाही का? फुकटचा वेळ वाया घालवायचा. काम ना धंदा. घरात काय कामं कमी आहेत का. तर म्हण शाळेत चला. जा म्हणाव ज्याला जायचं त्यान.
आता मी का जातोय शाळेत ही बघा ना? हीच शाळा जर घरापासून दूर असती ना तर, मी कशाला जातोय शाळेत तशी मला शाळेत पाठविण्याची कारण वेगळी होती. सांगू का आता? माझ्या जन्माअगोदर मैलभर तिकडं देवळात शाळा भरत होती. आता शिवारातील मंडळींनी दोन्ही मळ्यातल्या पोरांना पावसा-पाण्यात शाळेत जाण्याचा त्रास नको. पोरांना जाण्या-येण्यासाठी जवळ पडावं अशी जागा शोधली. ती ही जागा नेमकी आमच्या घराजवळच मिळाली. दोन्ही मळ्याच्या चौकात रस्त्याच्या कडेला पडीक मोकली जागा होती, तिथंच शिवारातल्या लोकांनी शाळा बांधली आणि ती सुरू ही झाली.
शाळा सुरू झाली, त्याच वर्षी चुलत भावानं माझं नावं शाळेत दाखल केलं. आता नावं शाळेत दाखल केल तर केलं. पण नाव तरी, खरं सांगावं का नाही. तसं पण नाही. त्याच्या आजोबाच मी नावकरी म्हणून जन्माला आलो अस घरातले म्हणतात. म्हणून पठ्यान त्याच्या आजोबाच नाव माझ्या बापाच्या नावापुढ टाकलं, आणि झाला मोकळा. आई-बाप तिकड कामावर आणि मी याला मोकळा दिसलो. अन माझ नाव टाकल शाळेत. घरातलाच असल्यान कोणी बोंब मारणार नव्हत. त्यात शाळेतला मास्तरही नातेवाईक निघाला. मग काय, दुधात साखर. हो!! यातही काही काळबेर होत. ते फक्त मलाच माहित.
काय झालं मी तसा लहानपणापासून खोड्या करण्यात पटाईत होतो म्हणा. त्याचा त्रास आमच्या चुलत्याच्या पोरांना होत असे. तशी यांची पोर काय लई शाहाणी होती असं समजायचं काही कारण नाही. ते सुधा माझी खोड करीत म्हणून तर मी, तसं त्याच्या बरोबर तसा वागत होतो, पण त्यांच्या बापाला म्हणजे माझ्या चुलत्याला वाटायचं की, मीच अगाऊ आहे. ठीक आहे तस्स तर, तस्स, मग मी, काय सोडतो की काय, एकदा तावडीत सापडल्यावर जाम चोपायचो, पण इतर पोर सांगायची की, पहिली खोड चुलत्याच्या पोरांनी केली. मग मला कसं मारणार. याचा त्याला राग होता. तो त्याने असा काढला. आई-बापाला वाटलं आपण कामावर गेल्यावर, हे पोरट इकड तिकड अस हुंदाडत राहील. त्यापेक्षा शाळेत जाऊन एका जागेवर तरी बसेल. आणि पोरांच्या भानगडी तरी, कमी होतील, म्हणून तर, आई-बाप म्हणाले बर झालं. नाही तरी शाळा भरायच्या वेळी आम्ही कामावर असतो.
काही नाही, मी, खोड्या करीतो. असे म्हणून बळ जबरीन मला शाळेत धाडलं होतं. हे मला कळत होतं, पण मी लहान होतो ना. त्यात मास्टर आमच्याच नात्यातला आणि चुलत भावाच्या जास्त जवळचा. रोजच्या बैठकीतला. त्यामुळं घरातली कटकट शाळेत गेली म्हणून घरच्यांना समाधान. आणि कामावरून घरी आला की, तुमच्या पोरानं याला मारलं. कुणाला ढकलून दिलं, तर कुणाला पाडलं या तक्रारी कमी झाल्या, म्हणून आई-बापाला समाधान, पण माझं काम वाढवलं, शाळा मास्टरला नवीन नोकर मिळाला. आता तुम्ही म्हणणार काही सांगता. हो खर आहे हे. कसं?
त्याचं अस झालं की, मास्तर नात्याचा मग काय. शाळेच्या जवळ कोण राहत. तर मी, मग चहा-पाणी, दुपारी जेवतांना कालवण कोण आणणार? शाळा भरल्याची आणि सुटल्याची घंटा कोण देणार? या साठी पैसे लागतात का? तर नाही. म्हणून मी बिनपगारी काम करणारा, एक नोकर मिळाला असे म्हणालो.. आणि तसा ही झेडपीच्या शाळांना वेगळा शिपाई नसतो. सारी काम मास्तर आणि पोरच करतात याला स्वावलंबन म्हणतात. कळलं का?
मी, आता लहान म्हणजे सात वर्षाचा होतो. अस म्हणतात खर-खोट काय ते शाळा मास्तर आणि आई-बाप यांनाच ठाऊक. मुलाचा हात डोक्यावरू घेऊन कानाला लागत असेल तर, वय सात वर्षे. असं मास्तरांचं साध सरळ सोप मुलाच वय समजण्याच गणित होत. त्यावेळी सात वर्षाचा म्हणजे लहानच होतो, म्हणून आवडीने सार करीत होतो, पण घरी आल्यावर चुलत भावाच्या पोरांना काही ना काही कारण काढून चांगलाच बुकलून काढी. आता तू मला कारण विचारणार हे मला माहित आहे. कारण मीच सांगतो ना. त्याच्या बापानं मला शाळेत पाठवलं नसत तर, माझ्या आई-बापानं मला कशाला शाळेत पाठवलं असतं. तसा मला शाळेचा कंटाळाच होता. दिवसभर एकाच जागी गप्प गुमान मांडी घालून बसायचं. मास्तर सांगल तेच म्हणायचं. मग खेळायचं कधी.
मी शाळेत जाऊ लागलो आणि घरातल्या शेळ्या चारण्याचे काम कमी झालं. हे एक बर झालं. हो खर सांगतो मी, शेळ्या चारण सोप समजू नका. सगळ्यात आगाऊ प्राणी आहे हा. दुसऱ्याच्या शेतात इतक्या झटकन तोंड घालुन उगवणाऱ्या पिकाचा असा शेंडा मारते की, कळणार सुद्धा नाही. काही खाण्याचे दिसले की, तुमचा फरपट गाडा झालाच म्हणून समजा. तुम्ही शेळीला टोपलीत खायला देऊन बघा. त्या टोपल्याला पायाने फटके मारून मारून सर्व सांडून टाकणार. नीट खाणारच नाही. मी शाळेत जाऊ लागली आणि आईच कामाला जाताना शेळी सोबत घेऊन जाई. बाप तर काही काम करू शकत नव्हता. कारण बापाला एक नव्हता. त्यामुळं शेतातील किंवा औत-काठीच काम तो कसा करणार.
हे सार बघून वाटायचं. चांगल्या मोठ्या पैशावाल्यां श्रीमंताच्या घरी जन्म झाला असता तर, जीवनातल्या सर्व अडी-अडचणी आपसूक सुटल्या असत्या. माझी काम कशी पटा पट झाली असती, पण नाही........
माझा जन्म अशा घरात झाला की,..रोजच्या खाण्या-पिण्याची पंचायत, बरं राहण्यासाठी स्वतःच घर तरी नीट असावं ना, पण नाही. नाही म्हणायला घराला चार भिंती तर होत्या, त्यावर गवताचं नाही तर, नदी किनारी वाढलेल्या गवताचे पाचट असे. पाऊस आला की, घरात गळणाऱ्या ठिकाणी वाट्या-लोट्या, बदली, ताट-टोप घरातली सर्व भांडी कामाला लागायची, मग कपडे, गोधड्या भिजण्यापासून वाचवण्यासाठी घरात स्पर्धा सुरू होई. झोपयचं तर दूर राहिलं, साधी, बसायांची सुद्धा पंचायत. अशा अवस्थेत घरात कसं रहावं असा प्रश्न पडायचा, पण विचार केला तर, कळत की, परमेश्वर म्हणा किंवा अज्ञात जी कोणी शक्ति आहे. जी कोणी ही प्रत्यक्ष किंवा अप्रत्येक्ष पाहिले नाही. तो जे काही करतो, त्या पाठीमागे काही तर निश्चित काही हेतू असतो हे, आपल्याला जस जसं आपलं आयुष्य पुढं पुढं सरकत जातं तस तसं जीवनातल्या खाचा-खोचा नजरेत येतात. लहानपणापासून आई-बाप, भाऊ-बहीण, मित्र-मैत्रणी, नातेवाईक, शेजारी आणि नोकरी किंवा व्यावसायत भेटणारे लोक काही ना काही समस्य घेऊन येतात तरी, किंवा समस्या निर्माण तरी करतात. काही मार्ग दाखवितात तर काही, मार्गात अडथळे निर्माण करतात. आता माझंच बघ ना.
आता जिथं माझा जन्म झाला, तिथं राहायचं, दुसरं काय काही पर्याय होता का? आणि बालवयात आपण भिकारी आहोत का श्रीमंत हे ते कळण्याचे वय नसतं. तेंव्हा तर, राज्याच्या राजवाड्यापेक्षाही आपलं घर मोठं वाटतं. मग काय राज्याच्या मुलाच्या कानाखाली कोणी मारायला सांगितलं तरी, आपली तयारी असते. या वयात भीती कशाला म्हणतात, हे माहीत कुठे असतं. मस्त मिळालं ते पोटात ढकलायचा आणि दिवसभर आई-बापाच्या नाही तर, बहीण-भावाच्या अंगाखांद्यावर खेळायचं. नाही तर, झाडाच्या फांदीला बांधलेल्या झोपाळ्यात बसून झुलायचं. नाही तर, फाटक्या गोधडीवर किंवा फाटलेल पटकूर गुंढाळून निजायचं. भूक लागली की, मोठ भोकाड पसरायचं. या शिवाय उधोग नाही. जेव्हा आपल्याला कळू लागत. काही हवं आहे, पण ते आपली माणस देत नाहीत. तेंव्हा हे कळू लागतं. शेजारचा गण्या आणि माझ्यात किती अंतर आहे. याची जाणीव होते. माझं ही तसच झालं.
वयाच्या सातव्या वर्षी खेळण्या-बागडण्याच्या वयात शाळेत जाव लागलं. घरा शेजारच्या शाळेत चुलत भावाने त्याच्या लहान पोरानं मी, त्रास देतो, म्हणून माझ्या आई-वडिलांना न विचारता, माझं नाव शाळेत घातलं. ते ही चुकीचं. हे कळलं तेंव्हा मी, नुकताच चौथी पास झालो होतो. त्याच कारण असं होत की, चुलत भावाचा आजोबा जो कोणी होता त्याचा मी, नावकरी आहे. असं घरातले लोक सांगतात. म्हणून त्याने तेच नाव शाळेच्या पटावर टाकलं आणि तिथच माझ्या नावाच पहिलं बारसं झालं.
चौथीपर्यंतची शाळा घराजवळ होती म्हणून नावाचा प्रश्न कधी आला नाही. कारण सारं कसं आडनावाने चालत होत पण, जेंव्हा दाखला हातात घेऊन शाळा सोडण्याची वेळ आली आणि माझ्या नावातला गोंधळ लक्षात आला. आता पाहिलं शाळेत नाव दाखल करण महत्वाचं होत म्हणून पुन्हा तेच नाव धारण करून पुन्हा चुकीच्याच नांवान मी, शाळेत जाऊ लागलो. पुढे आई-बाप, भाऊ सर्वजण माझं नाव बदलायचं विसरूनच गेले.
आता दोन-तीन मैल गावात शाळेत जाऊन पुढं शिकायचं होत, म्हणून जायचं होतं, पण गावात जाऊन शिकायचं म्हणजे पाटी, दप्पर, पेन्सिल, वही, पुस्तक याचा खर्च. पुन्हा जेवणाची सोया आणि राहण्यासाठी जागा हे सोपं आहे का? म्हणजे पर्यायाने पुढचं शिक्षण थांबणार असं वाटत असतानाच माझ्या आयुष्याला एकदम कलाटणी मिळाली.
पाचवीत प्रवेश घेतला. शाळा सुरू झाली. म्हणून पहिल्या दिवशी शाळेत सोडायला माझा बाप आला होता. त्यावेळी माझ्या बापाला एक हात नाही, हे मुलांना कळलं होतं.... लहान होतो कळत नव्हतं तोवर ठीक होत. इथं पर्यंत ठीक होत, आता जरा कळू लागले होते. पुढे पुढे लहान-सहान भांडणात मुलं मला थोट्या म्हणून चिडऊ लागली, आणि एक दिवस माझ्या नेहमीच्या सवईप्रमाणे मी, एकाला दगड फेकून मारला, समोरचा रक्तबंबाळ झाला. ज्याला दगड लागला, ते बड्या घरचं पोरगं होतं. म्हणून सारी पोरं आपापलं जीव घेऊन शाळेत पळाली, मास्तरांनी खरं-खोट तपासण्याचा सपाटा सुरु केला. पण चौकशीत करताना कळलं की, चूक माझी नाही. म्हणून प्रकरण जास्त लांबलं नाही आणि माझ्या जीवनाची दिशाच बदलून गेली. आणि पुढे आठवीत गेल्यावर मोठ्या वर्गातला मुलगा माझा खास मित्र झाला, आणि पुढे पाचवी ते अकरावी पर्यंत त्याचाच घरी राहिलो. माझी घरची गरिबी आणि शाळेतली थोडीशी हुशारी इथं कमी आली.
बघा एक भुके कंगाल मी, पाचवीत आल्याबरोबर या मित्राच्या छत्र छायेत इतका बदलून गेलो की, माझ्या वर्गातीलच काय पण बाकीची मुलं माझ्या पासून चार हात दूर राहू लागली.
त्याच झालं अस की, माझा हा मित्र अभ्यासात जरा जेमतेमच होता, पण तो ही असाच माझ्यासारखा रागीट डोक्याचा होता. त्याचा अभ्यास सुधारावा म्हणून त्याची बहीण भाऊ एकटाच असल्याने खूप प्रयत्न करीत होती. त्याला चांगला सोबती म्हणजे मित्र शोधण्यासाठी अधून मधून शाळेत येत असे. तेंव्हा तिला कळलं की, मी, तिच्या भावाचा मित्र आहे. तिला मनात काय वाटले कोणास ठाऊक पण ती तडक तिच्या आईकडे गेली. माझी सारी कहाणी तीन तिच्या आईला सांगून हा मुलगा (म्हणजे मी) आपल्या घरी काही दिवस विसू बरोबर राहू दे. म्हणजे वीसूला सोबत होईल आणि त्याला दोन-तीन मैल चालत यावं लागत तो त्याचा त्रास वाचेल. पोरगा चांगला आहे, पण शिकवायची त्याच्या घरच्या लोकांची परिस्थिती नाही.
विसू माझा मित्र त्याची मोठी बहीण आमच्या शिवारातील एक चांगल्या घरंदाज कुटुंबात लग्न करून सुखान नांदत होती. त्या दोघा बहीण-भावाच एकमेकावर जीवापाड प्रेम होत. भावाला अभ्यासात चांगली गती नसल्याने थोडी नाराज होती. म्हणून ही नामी युक्ती तीने शोधली होती.
तिचा नवराही चांगला सरकारी नोकरीला होता. आता आमच्या घराजवळच त्याची शेती, म्हणून जास्त ओळख होती. त्यात हे शाळेतल्या दगडमारीच्या प्रकरणापासून मी, जास्त नावारुपाला आलो होतो. आणि अभ्यासात बरा होतो, पण आर्थिक परिस्थिती ठीक नव्हती. हे मित्राच्या बहिणीला माहित असल्याने, तीने भावाला सोबत आणि अभ्यासासाठी मदत होईल म्हणून, मला गावातच त्यांच्या घरी राहण्यासाठी सांगितल. आणि मी, ही ते मान्य केल. आम्ही तर अगोदरच मित्र झालो होतो, पण आता अधिकृत दुजोरा.
पुढे मित्राच्या बहिणीच्या नवऱ्याची औरंगाबादला बदली झाली. ती ही आई-वडील, भावापासून दूर गेली. बघा म्हणजे जस काही तिला अगोदरच हे पुढे सार घडणार होत. याची चाहूल लागली होती की, काय अस वाटलं, म्हणून मला या माऊलीन त्यांच्या घरी आई आणि भावाच्या सोबत राहण्यासाठी सांगितल होत. आई आणि भावावरच हे आलोट प्रेम मी, त्यावेळी पाहिलं होत. मला तेंव्हा एवढ कळत नव्हत, पण आज ते जाणवत आहे.
मीच तिथ परका होतो. तर मला कोण, कोणासाठी काय त्याग करीत आहे, हे कसं समजणार होत. हे कळलं तेंव्हा मी, नोकरीला लागलो होतो. आणि आता मागे वळून बघतो तेंव्हा हे कळत आहे. या घरात मी, परका आहे असं कधीच वाटल नाही. मला माझ्या घरातून जेवढ प्रेम मिळाल नाही त्याच्या किती तरी पट या मित्राच्या घरात प्रेम मिळाला. मी, याच घरातला एक घटक म्हणूनच राहिलो होतो. पुढे अकरावी पर्यंत त्याचाच घरी राहिलो. यासाठी खोली भांड की, जेवणाचे पैसे मित्राच्या आईने घेतले नाहीत. नाती कशी जपली जातात हेही पाहिलं होत.
मी, त्यांच्यासाठी काय केलं होत. फक्त त्यांच्या मुलांसोबत अभ्यास करून सोबत केली. अनावधानाने मित्राच्या घरी आलेला मी, आज त्यांनी दिलेल्या प्राथमिक असऱ्याच्या जोरावर, पैसेवाल्या बापाच्या घरी जन्म झाल्याचं सुख अनुभवता अनुभवता, त्यांच्या मुलाच्या संगतीत मोठा झालो, पुढे अनंत अडचणी आल्या पण, मार्ग मिळत गेला, बघता बघता आम्ही दोघही अकरावी पास झालो. ते ही एकाच वर्षी. हा ही योगायोगच होता. कारण मी पाचवीत होतो, तेंव्हा तो आठवीत होता. आणि आता दोघ हि अकरावी एकाच वेळी सुटलो हा योगायोग नाहीतर काय होत. पण अडचण अजून पुढेच होती.
आता अकरावी नंतर पुरे पुण्याला जाऊन शिकायचं होत, पण ज्याने माझा आता पर्यंतचा खर्च केला. त्याला प्रवेश मिळाला नाही. कारण माझ्यापेक्षा त्याला गुण कमी होते. हे झालं मित्राचं, पण त्याच्या प्रवेश प्रक्रियेवर माझं शिक्षण अवलंबून होतं हे कॉलेज प्रशासनाला कुठं माहीत होतं.
मी, पाचवीत अभ्यासासाठी मित्राच्या गेलो आणि अकरावी पर्यंत त्याचाच घरी राहिलो. पण त्यांच्या मुलाचा प्रवेश काही कमी गुणांमुळे कॉलेजने नाकारावा. याला काय म्हणणार!! नियतीच हे अस क्रूर वागण मला आवडल नाही. कारण मित्राचा कॉलेज प्रवेश होणं मला पुढे शिक्षण घेण्यासाठी महत्वाचे होते. आता म्हणणार हा माझा स्वार्थ आहे. हो म्हणायला माझा त्यात मोठा स्वार्थ होता. कारण माझ पुढच शिक्षण त्याच्या प्रवेशावर अवलंबून होत.
माझ कॉलेजचा प्रवेश फॉर्म घेण्यासाठी पुणाला जाण्या-येण्यापासून ते त्याचा आणि माझा फॉर्म भरण्याचा सर्व खर्च त्यानेच केला होता. त्याच नशीब कमी पडले. की, माझ दुर्दैव म्हणा. त्याच्या एकूण गुणांची बेरीज कॉलेज प्रवेशासाठी कमी पडली आणि त्याला प्रवेश मिळाला नाही म्हणून माझ्या पुढील शिक्षणासाठी दौडत निघालेली, फुकटच्या डिझेल-पेट्रोलची, बिन चाकाची आणि दोन पायाची गाडी चिखलात अशी रुतून बसली की, मी, सरकारी रोजगार हमी योजनेच्या कामावर जाऊन सुद्धा, काही केल्या पुढे सरकली नाही.
माझं शिक्षण आता थांबलं होतं. मी, आता घरातल्या मंडळी सोबत रोजगार हमी योजनेच्या कामावर रस्त्यावर माती, आणि दगडाची पिचिंग करण्याचे काम करू लागलो होतो, तर एक दिवस केलेल्या कामाची मोजणी करताना, मोजणी करणारा साहेब म्हणाले!!
हा मुलगा शाळेत जातो का?
जात होता, आता नाही जात. माझी वहिनी म्हणाली.
झालं.....परत पुढचा प्रश्न आला. काय शिक्षण घेतलं. साहेब म्हणाला.
अकरावी पास... वहिनी म्हणाली.
ठीक आहे पण,..... शिकलेल्या पोरांना असं माती, दगड उचलायला लावण बरोबर नाही. मी त्यालाथोड वेगळं काम देतो. अस करा याला उद्यापासून सुकडी वाटण्याच कामावर पाठवा. चालेल ना काय? साहेब....
मी, हो म्हणालो आणि त्या दिवसांपासून मी, कामावरल्या रोजगार हमी योजनेच्या लोकांना सुकडी वाटण्याचे काम करू लागलो.
पुढे नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. काही दिवसांनी अशी एक घटना घडली आणि पुन्हा आयुषण वळण घेतलं. त्याच असं झालं. इथल्या कामावर आमच्याच सोबत एक नवऱ्यानं सोडलेली बाई रोजगार हमी योजनेच्या कामावर येत होती. रोज दुपारी आमच्या सोबतच जेवण करीत असे. त्या सोबत म्हटल्यावर इकडच्या-तिकडच्या गप्पा होत होत्या. या गप्पात घरच्या अडी-अडचणीच्या गप्पा ही होत. या गप्पांनी माझं नशीब बदलून गेले. कामावरल्या बाईचा भाऊ पुण्यास कॉलेजच्या प्रवेशासाठी जात-येत होता. पण त्यालाही प्रवेश मिळत नव्हता. हे आमच्या वहिनीला माहित नव्हत, ती आपली माझ शिक्षण कस थांबल हे यराहू राहून कमावर सांगत होती. पण जिचा भाऊ पुण्यात जा-ये करीत होता, ती बाई मात्र आमच्या वहीनीच बोलण टीप कागदासारख टिपत होती. हे आमच्या वहिनीला कळलं नाही. पण जेंव्हा कळलं तेंव्हा वहिनी अशी भडकली की, काही विचारू नका, पण याच गोष्टीचा मला पुढील शिक्षणासाठी खूप खूप फायदा झाला. एकीकडे गरिबीचे चटके सोसत होतो तर, नियती माझ्या भोवती वेगळं जल विणत होती.
आमची वहिनी कामावर असताना दुपारच्या वेळी माझ्या शिक्षणाचा पाढा वाचीत असे. हे ती बाई कान देऊन ऐकत होती, पण बोलत काही नव्हती. या बाईनं मी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आहे पण, गरिबी आणि आर्थिक अडचणीमुळे जाणार नाही. हे कळल्यावर तिने ही गोष्ट तिच्या भावाला सांगितलं होतं....माझ्या मित्राला जसा कॉलेजने प्रवेश नाकारला, तसाच या कामावरल्या बाईच्या भावालाही कॉलेजन प्रवेश नाकारला होता, पण गंमत तर पुढेच होती. आता माझ्या जागेवर आपला भावाला प्रवेश कसा मिळेल म्हणून तिने ही वार्ता घरी भावाला सांगून टाकली. पण आता हे खरं की, खोटं हे आमच्या घरी आल्याशिवाय त्यांना कळणार कसं. म्हणून, ऐकलेलं खरं आहे की, खोट हे जाण्यासाठी, एक दिवस, या बाईचा भाऊ आणि त्यांचा मामा, रात्रीच्या काळोखात आमच्या घरी आले. आणि बोलण्याच्या संदर्भाने माझ्या आडणी बापाचं कुतूहल जागं झालं. आणि मग आमच्या वहिनी आणि बापच डोक भडकल त्या कामावरल्या बाईला वहिनीने अशा शिव्या घातल्या की, ती बाई परत त्या दिवसापासून कामावर आलीच नाही. आणि मी ही त्या दिवसापासून पुन्हा कामावर गेलो नाही. दुसऱ्याच दिवशी माझी कॉलेजला रवानगी झाली. कॉलेज फीचे पैसे वहिनीच्या बापाकडून घेऊन मी आणि माझा भाऊ पुण्यास गेलो.
त्याच असं झालं मला कॉलेजला प्रवेश मिळाला, पण मी कॉलेजला जात नाही म्हणून माझ्या जागेवर तो कॉलेजला जाण्याचा विचार करीत होता. प्रयत्न केले तर माझ्या जागेवर आपली वर्णी कशी लागेल असे वाटत असावे म्हणून तो या धावपळीत होता. त्यांना मी, योग्य बळीचा बकरा वाटलो असणार, म्हणून मामा भाच्यांनी माझं घर गाठलं होतं. आणि हे त्यांचं माझ्या घरी येण्यानं माझा कॉलेजला जाण्यासाठीचा मार्ग अधिक सुकर झाला.
शेती अडून पिकत नाही.पाऊस वेळेवर पडत नाही. नापीक जमीन करसायच काय तीच बाप म्हणाला "गरिबीचे दुखणं रडत बसण्यापेक्षा फुलून टाका ती जमीन" आपल्या पोराच्या जागेवर दुसऱ्याचा पोरगा शिकणार हे काही घरातल्या मंडळींना आवडले नाही. आणि आता नातेवाईक मंडळींकडून उसणे पैसे घेऊन का होईना याला कॉलेजला पाठविले पाहिजे यावर घरातील सर्वांचे एकमत झाले, आणि कॉलेजमध्ये जाण्याचा राज मार्ग मोकळा झाला. माझ्या मोठ्या वहिनीच्या बापाला माझी दया आली.
कॉलेज सुरू होऊन दोन-तीन महिने झाले होते. मी, कॉलेजमध्ये जाऊ लागलो. माझा मित्र मात्र घरीच राहिला. माणूस किती स्वार्थ असतो पहा. खर तर मी आता त्याच्यासाठी काही करायला पाहिजे होत, पण जिथ मीच दुबळा होतो. तिथ मित्रासाठी काय करणार होतो. असो.. वाईट वाटल. पण पुढील वर्षी पुण्यात नवीन कॉलेज निघाल्याची वार्ता ऐकली. त्यानाही विध्यार्थ्यांची गरज होती म्हणून मी, मित्रासाठी एक प्रवेश फोर्म घेऊन घरी आलो आणि पुढीलं वर्षापासून पुन्हा आम्ही एकत्र आलो. आता मला हे कळलं नाही की, नियतीने एक वर्षासाठी आमची अशी क्रूर थट्टा का केली असावी बर.......
याला म्हणतात जाणीव. नियमित प्रयत्न करू बघ फळ मिळत की, नाही. म्हणून म्हणतात.....
||ना प्रयत्ने वाळूचे कण रगडीता, तेलही गळे||
इथ तेल, वाळू या शब्दांचा अर्थ आहे तसा न घेता एक उपमा म्हणून घेतला आहे. गैरसमज नसावा. या सर्व भानगडीत माझ्या मनाला प्रेरणा देणाऱ्या बऱ्याच घटना घडत गेल्या. मला आजही प्रश्न पडतो की, मी शिकलो कसा. काय होत माझ्या जवळ? मला लोक विचारतात तू कॉलेज पूर्ण केलं कसं?
काय सांगणार हसू ही येत रागही येतो आणि आनंद वाटतो. आपल्या हाती काहीही नसतं. अडचणी येतात त्यातून सावरण्यासाठी प्रेरणा मिळत जाते. खचून न जाता पुढे जात राहा रस्ता आणि यश नक्की मिळते. ते थोडं फार कमी जडत असेल पण मिळाल्याचं समाधान खूप मोठं असत. म्हणून तर मुंबईच्या अनोख्या नगरीत मी २५/- रुपये घेऊन आलो. दोन तीन महिने एका खाजगी शाळेत महिना १००/- रुपये पगारावर काम केले. आणि पुढे काही दिवसांनी मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागात कला शिक्षक म्हणून ३८ वर्षे सेवाकरून सेवानिवृत्त झालो. अनेक मोठे मान-सन्मान, पुरस्कार प्राप्त झाले. आणि मला कथा कविता लिहिण्याचा छंद असल्याने मोठा मित्र परिवार मिळाला. आजही मिळत आहे. आता मागे वळून पाहतो तेंव्हा पुन्हा त्या गतकाळातील आठवणी जाग्या होतात आणि
जगण्यासाठी प्रेरणा देतात. कोणतेच काम लहान नसते. आपण कुठे जन्माला यावे हे आपल्या हाती नाही. पण कसं जगावं हे मात्र आपण ठरवायचं असतं गरीब-गरीब म्हणत सवलतींचा वाट बघत जगण्यात काय मजा आहे. कोणी तरी मला देईल अस म्हणण्यापेक्षा तुम्ही मिळेल ते स्वीकारीत पुढे चालत रहा मार्ग मिळत जातो. रस्ता चालत नाही त्यावरून आपण चालायचं आहे. लहान मुलासारखा पडत-झडत, उठत-बसत, कधी हसत, कधी रडत मौज-मजा करीत. रस्त्यात पडलेले काटाही आपल्याला जगणं शिकवितो.
MORE POSTS-
टिप्पण्या