का साजरी केली जाते मकर संक्रांत...!!
सणांना संस्कृती, परंपरेनुसार ऐतिहासिक महत्व प्राप्त होते. असे अनेक सण आहे ज्यांना धर्माच्या,ग्रंथांच्या, आधारावर नियमानुसार साजरं केलं जातं. मकर महिन्यात कृष्णा पंचमीवर देशातील बहुतेक सर्व राज्यांमध्ये मकर सक्रांती वेगवेगळ्या सांस्कृतिक स्वरूपात साजरी केली जाते.
का म्हणतात मकर संक्रांती?
'मकर' हा शब्द मकरराशीला संबंधित आहे, तर 'संक्रांती' याचा अर्थ संक्रमण असा आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य धनु राशीपासून मकर राशीत प्रवेश करतो. एक राशीला सोडून दुसर्या राशीत प्रवेश करण्याच्या प्रक्रियेस संक्रांती म्हणतात. सूर्य मकर राशीत प्रवेश करत असल्याने या वेळेस 'मकर संक्रांती' असे म्हणतात. हिंदू महिन्यानुसार, मकर संक्रांती उत्सव पौष शुक्ल पक्षामध्ये साजरा केला जातो.
उत्तरायन
कृष्ण आणि शुक्ल पक्ष या दोन भागानुसार उत्तरायण आणि दक्षिणयान असे वर्षाचे दोन भाग आहेत. या दिवसापासून सूर्य उत्तरायण होतो. उत्तरायण म्हणजे त्या काळापासून पृथ्वीचा उत्तर गोलार्ध सूर्याकडे वळतो, त्यानंतर सूर्य उत्तरेकडून निघू लागतो. त्याला सोमयान असेही म्हणतात. उत्तरायण हा मकर संक्रांती ते कर्करोग संक्रांती दरम्यानचा 6 महिन्यांचा कालावधी आहे.
प्राचीन ग्रंथातील उत्तरायण महत्त्व
महाभारतात कुरु वंशाचे संरक्षक भीष्म हे बाणांच्या शय्येवर (शरशय्येवर) उत्तरायणाची वाट पहात पडून होते. त्यांना इच्छामरणाचे वरदान होते. ज्या दिवशी उत्तरायण सुरू झाले त्यादिवशी त्यांनी प्राणत्याग केला. भारतीय परंपरेत उत्तरायणाचा काळ दक्षिणायनापेक्षा अधिक शुभ मानला जातो.
भोगी
संक्रातीच्या एक दिवस आधी महाराष्ट्रात भोगी सण साजरा होतो. या दिवशी सर्व शेंगभाज्या, फळभाज्या यांची तिळाचा कूट घालून केलेली मिश्र भाजी, तीळ लावलेली बाजरीची भाकरी, लोणी अणि मुगाची खिचडी असे पदार्थ आवर्जून केले जातात. संक्रांतीच्या दिवशी गुळाची पोळी आणि तिळगुळाचे विशेष महत्त्व असते.
महाराष्ट्रातील संक्रांत
महाराष्ट्रात हा सण तीन दिवस साजरा करतात. यास भोगी, संक्रांत व किंक्रांत अशी नावे आहेत. संक्रांतीस आप्तस्वकीयांना आणि मित्रमंडळींना आणि लहान मुलांना तिळगुळ वाटतात. तसेच स्त्रिया या दिवशी 'तिळगुळ घ्या आणि गोड बोला' असे सांगून हळदी-कुंकवाचा कार्यक्रम करतात. रथसप्तमी हा संक्रांतीच्या हळदीकुंकवाचा शेवटचा दिवस असतो. मराठी स्त्रिया संक्रांतीच्या दिवशी आवर्जून काळी साडी नेसतात.
तीळ वापरण्यातला दुसरा अर्थ सिग्धता. स्निग्धता म्हणजे स्नेह-मैत्री या स्नेहाचे गुळाशी मिश्रण करतात. स्नेहाची गोडी वाढावी हा त्यातला हेतू. तेव्हा या दिवशी या तिळगुळाची देवाण घेवाण करायची, स्नेह वाढवायचा, नवीन स्नेहसंबंध जोडायचे. जुने असलेले समृद्ध करायचे, तुटलेले आवर्जून पूर्ववत करायचे हा कार्यक्रम असतो.
शेतकऱ्यांसाठी महत्वाचा सण
या दिवसापासून वसंत ऋतुला सुरुवात होते आणि बीजांना अंकुर फुटतात. दरम्यान खरीप पिकांची कापणी झालेली असते आणि रबी पिकांची पेरणी होते.यामुळे हा शेतकऱ्यांसाठी महत्वाचा सण मानला जातो.
तिळवण
नवविवाहित वधूचे हळदीकुंकू विवाहानंतरच्या प्रथम संक्रांतीला करण्याची प्रथा आहे. तिला यासाठी काळी साडी भेट दिली जाते. हलव्याचे दागिने मुलीला व जावयालाही देऊन त्यांचे कौतुक केले जाते.
बोरन्हाण
लहान बालकांनाही संक्रांतीनिमित्त काळ्या रंगाचे कपडे घालणे व त्यांना हलव्याचे दागिने घालणे अशा पद्धती दिसून येतात. चुरमुरे, बोरे, हरभरे, उसाचे तुकडे, हलवा असे मिश्रण लहान मुलांच्या डोक्यावर ओततात. अलीकडे यामधे गोळ्या, छोटी बिस्किटे घालण्याची हौसही दिसते. तसेच या मिश्रणामध्ये लहान मुलांची आवडती चॅाकलेट्सही घालतात. याला बोरन्हाण अथवा लूट असे म्हणतात. बालकांच्या वयाच्या पाचव्या वर्षापर्यंत बोरन्हाण केले जाते.
पतंग महोत्सव
संक्रांत या उत्सवास पतंग महोत्सव म्हणुनही ओळखले जाते. या दिवशी छोट्या मुलांपासून मोठ्यापर्यंत पतंग उडवतात. पतंग उडवण्यामागचे महत्वाचे कारण म्हणजे काही तास सुर्यप्रकाशात घालवणे जे आरोग्यासाठी लाभदायक ठरते. गुजराथ मध्ये पतंग महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
टिप्पण्या