विदुषक


विदुषक

किती वाईट असतं ना जग! आपण ज्यांच्यासाठी राब राब राबलो त्यांच्या डोळ्यांतून आपल्यासाठी दु:खाचा एक थेंबही वाहिला नाही. निदान आपण मेल्यावर तरी आपल्या मुलांनी चार दोन आसवे गाळायला हवी होती. दु:ख अनावर होऊन सेठ चांदीमल सोनामलचा पिंपरणीच्या झाडावर बसलेला आत्मा स्वत:च रडायला लागला.

इतक्यात समोरच्या झाडावर काहीतरी खुडबूड झाली. भुताच्या भीतीने चांदीमल सोनामलचा आत्मा जरासा दचकला. आपणही भूतच आहोत या विचाराने तो सावरला.

"काय शेठ, जीवंतपणी पैशासाठी रडत होता, मेल्यावरही तुमची रडारड थांबली नाही का?"

अलगद त्यांच्या शेजारी येऊन बसलेला आत्मा हसत होता. शेठ चांदीमलने त्याच्याकडे निरखून पाहिलं पण ओळखीची एकही खूण त्याच्या चेहऱ्यावर दिसत नव्हती.

"कोण रे बाबा तू? आणि का माझ्या दु:खावर डागण्या देतोहेस?" चांदीमल शेठचा उदासवाणा चेहरा अधिकच भेसूर दिसत होता.

"अहो शेठ, मेल्यावर माणसाला कुठलं आलंय सुख आणि दु:ख?" समोरचा आत्मा अजून हसत होता. "एवढं कोणतं मोठं दु:ख होतं तुम्हाला जे मेल्यावरही तुमची पाठ सोडत नाही."

"अरे, काय सांगू तुला? काय का खस्ता नाही खाल्ल्या या दिवट्या पोरांसाठी? दिवसरात्र राबलो. लांडी लबाडी केली. डबल टिबल व्याज लावून सावकारीचा धंदा केला. माडीवर माडी चढवली. नको नको ते पाप केलं. खोटं नाटं करून लोकांच्या जमिनी स्वत:च्या नावावर केल्या. कोणासाठी? पोटच्या पोरांसाठीच ना? पण त्यांचं माझ्यावर प्रेम नव्हतंच कधी! माझ्या मरणाची वाटच पाहत होते असं म्हण ना. समशानभुमीतच त्यांनी इश्टेटीच्या वाटणीसाठी मारामारी सुरू केली. हजार पाचशे लोकांसमोर शेठ सोनामल चांदीमलच्या इज्जतचा कचरा झाला. तिरडीवर झोपलेला माझा आत्मा काय म्हणत आसंल?" आपण आता फक्त आत्मा म्हणूनच उरलोय, याचं भान न राहिलेला सेठ चांदीमलचा आत्मा पुन्हा ढसाढसा रडायला लागला.

"शांत व्हा शेठ, शांत व्हा. आता रडून काय होणार? डोळे पुसा बरं. लोकांना असं रडताना पाहून मलाही रडू येतं." समोरच्या आत्म्याने शेठजींचे डोळे पुसले.

"आता तू का रडतोहेस वेड्या? आणि तू आहेस तरी कोण?"

"मी? मी आहे एक विदुषक. स्वत:चं दु:ख बाजूला ठेवून लोकांना हसविण्याचं व्रत घेतलेला नकलाकार. तुम्हाला म्हणून सांगतो शेठ, कधी कधी दु:ख आणि वेदनेने कळवळायचे, लोक त्यालाही विनोद समजून हसायचे. वाईट वाटायचं, पण नंतर सवय झाली. स्वत:च्या दु:खावर रडायला कधी सवडच मिळाली नाही. जीवंतपणी कधी रडलो नाही पण मेल्यावर मात्र...."

"का? तुझ्याबी इश्टेटीसाठी भांडणं झाली होती का भौ?" शेठ चांदीमलला पहिल्यांदाच विदुषकाच्या बोलण्यात रस वाढला होता.

"विदुषकाला कुठून आलीय इश्टेट न् फिश्टेट! तुमच्यासारखी माझ्या मयताला हजार पाचशे माणसं नव्हती. फार फार तर वीस पंचवीस असतील. त्यांच्यापैकी थोडेफार रडत होते बिच्चारे."

"भाग्यवान आहेस मित्रा! चांदीमलला विदुषकाच्या भाग्याचा हेवा वाटू लागला होता."

"कशाचं डोंबलाचं भाग्य! आयुष्यभर हसवून हसवून लोकांचं मनोरंजन करत होतो. मेल्यानंतर लोक माझ्यासाठी रडत होते. आत्मा तीळ तीळ तुटत होता. वाटलं, तिरडीवरून उठून दोनचार उलट्या पालट्या उड्या माराव्यात...." डोळ्यांत आलेले अश्रू पुसत विदुषक बोलला.

मेल्यानंतरही लोकांना हसविण्यासाठी धडपडणाऱ्या विदुषकाचे महान विचार ऐकून शेठला आपल्या कोतेपणाची कीव वाटली.

"अरे, अरे, सांभाळ स्वत:ला." विदुषकाने आपले अंग झोकून दिले. शेठ चांदीमलने त्याला सावरेपर्यंत विदुषकाने हवेत दोन चार कोलांटउड्या मारल्या. वेडेवाकडे चाळे करून चांदीमल शेठला पोट भरून हसवलं.

लोकांना हसविण्याचं त्याचं विदुषकी व्रत मेल्यानंतरही अव्याहतपणे चालू ठेवलं होतं.


MORE POSTS-

गरिबी जगायला शिकवते.



आई वडिलांना वृद्धश्रमांत ...?




 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गरिबी जगायला शिकवते.

का साजरी केली जाते मकर संक्रांत...!!

आई वडिलांना वृद्धश्रमांत ...?